शिक्षक व पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार होते, तर 13 जूनला मतमोजणी केली जाणार होती. मात्र आता ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. (Teacher and Graduate Legislative Council elections postponed; Decision of the Election Commission)
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती. भारत निर्वाचन आयोगाने याबाबतची प्रेस नोट जारी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्यावतीने निवडणूक आयोग आणि हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलली आहे.





