मुंबई – शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी मतदान होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच धनुष्यबाण चिन्हाऐवजी मशाल या निवडणूक चिन्हावर लढत आहे.
या निवडणूकीतून भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने केवळ ही पोटनिवडणूकीची केवळ औपचारिकता राहिली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. लटके यांच्यासमोर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे.
दरम्यान, उद्या अंधेरी पूर्व मतदारसंघात 38 मतदान केंद्रावर मतदान होईल. मतदानासाठी एकूण 2 लाख 71 हजार 502 मतदार पात्र आहेत. मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे म्हणून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित केला जाईल.