जादा व्याजाच्या आमिषापोटी ठेवली होती रक्कम
पुणे – भांडवल तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेल्या येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यात खातेदारांना अवघे 50 हजार रुपये काढण्याचे बंधन घातले आहे. मात्र, या निर्णयाचा फटका पुणे महापालिकेसही बसणार आहे.
पालिकेची सुमारे 105 कोटींची मुदतठेव या बॅंकेत तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानुसार ठेवली आहे. दरम्यान, या बॅंकेत पालिकेकडून आणखी 366 कोटी रुपये ठेवण्यात आले होते. मात्र, त्याची मुदत डिसेंबर 2019 मध्ये संपल्याने पालिकेने तातडीने ही रक्कम काढून घेतल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आरबीआय तसेच राज्य शासनाच्या आदेशाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जादा आमिषापोटी ही रक्कम ठेवली होती. तर त्या ठेवींच्या नावाखाली अनेकांनी हात ओले केले असल्याची शक्यता आहे. मात्र, ही बॅंक आर्थिक अडचणीत आल्याने महापालिकेचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
आरबीआयच्या नियमांचा आधार घेत, शेड्यूल बीमध्ये 4 हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या बॅंकेत महापालिकेच्या ठेवी ठेवणे शक्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेनुसार प्रशासनाने सुमारे सहाशे कोटींच्या ठेवी खासगी बॅंकेत ठेवल्या आहेत. त्यात डिसेंबर 2018 मध्ये सुमारे 366 कोटींच्या ठेवी येस बॅंकेत एका वर्षांसाठी ठेवल्या होत्या. याशिवाय, जुलै 2019 मध्येही सुमारे 105 कोटींच्या ठेवी याच बॅंकेत पुन्हा ठेवल्या आहेत. त्याची मुदत जुलै 2020 मध्ये संपल्यानंतर पालिकेकडून ही रक्कम काढून घेण्यात येणार होती. मात्र, आता निर्बंध आल्याने ही रक्कम अडकून पडण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
येस बॅंकेवर निर्बंध आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तातडीने आपल्या ठेवींची माहिती शोधली. त्यावेळी 366 कोटी रकमेच्या दोन ठेवी असल्याचे समोर आले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा प्रशासनाने ठेवींची तपासणी केली असता यात ही 105 कोटींची ठेव असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या ठेवीची माहिती शोधण्यास सुरुवात केली आहे. शुकवारी रात्री उशिरापर्यंत ही माहिती शोधण्यात येत होती. मात्र, एवढ्या मोठ्या ठेवीची माहिती बॅंकेवर निर्बंध आल्यानंतर सापडत कशी नाही, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.