राजेंद्र भुजबळ
शिर्डी -आगामी शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीची चाहूल लागताच शिर्डीत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा राजकीय गड समजला जातो. त्यामुळे ही निवडणूक मोठी चुरशीची होणार यात शंका नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीची ताकदही वाढली असून शिर्डीच्या इतिहासात प्रथमच साई संस्थान विश्वस्त मंडळात स्थानिक चार विश्वस्तांची निवड झाल्याने महाविकास आघाडीचा गड आणखी मजबूत झाला आहे. ही निवडणूक भाजप विरोधात महाविकास आघाडीत होणार असून दोन्हीही पक्षांच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते.
शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर शिर्डी नगरपरिषदेमध्ये झाले. यामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. कारण नगरपंचायत निवडणूक 2021 मध्ये सर्वपक्षीय टाकलेला बहिष्कार महत्वाचा ठरला आहे. त्यानंतर सुद्धा काही जणांनी राजकीय मतभेदांमुळे ऐन शेवटच्या दिवशी नामनिर्देशन दाखल केल्याने सहा उमेदवारांची अखेर नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. परंतु उच्च न्यायालयामध्ये शिर्डी नगरपरिषद होण्यासाठी शिवाजीराजे गोंदकर यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना शिर्डी नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि तसा अद्यादेश शासनाने जाहीर सुद्धा केला आहे.
पूर्वी नगरपंचायत अस्तिवात असताना 17 नगरसेवक होते तर आता नगरपरिषद झाल्याने ही संख्या वाढून 23 झाली आहे. त्यामुळे वेगवेगळे वॉर्ड, आरक्षण आणि प्रभाग सर्वांमध्ये बदल होणार असून त्याचा निर्णय तीन ते चार दिवसात शासनाच्या वतीने लवकर प्राप्त होणार आहे. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का? हा प्रश्न अजूनही कायम असला विभाग रचना, आरक्षण, प्रभाग, मतदारांची संख्या यात फेरबदल होणार आहे.
भाजपकडून आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील नेमकी कुणाला उमेदवारी देणार यावर सर्व राजकीय गणित अवलंबून आहे. दुसरीकडे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. या दोघांमध्ये ऐनवेळी इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापले तर तिसरा पर्याय म्हणजेच अपक्षांची मोट बांधून टक्कर देण्यासाठी तिसऱ्या पॅनलची सुद्धा निर्मिती होऊ शकते.
नगराध्यक्षाला थेट विश्वस्तपदाची लॉटरी
नगरपरिषद निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगराध्यक्षाच्या पदरात शिर्डी विश्वस्त पदाची लॉटरी पडणार आहे. त्यामुळे शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे सर्व पक्षांचे नेते निवडणुकीमध्ये आवर्जून लक्ष घालतात, त्यामुळे राज्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जून महिन्याअखेर जाहीर होणार असून, याची चाहूल लागल्याने शिर्डीत उत्साहाचे वातावरण सध्या बघावयास मिळत आहे.
======================