नवी दिल्ली । माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना आज स्वगृही म्हणजे पुन्हा कॉंग्रेस पक्षात परतले आहेत. २०१९ मध्ये पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्या आरोपांवरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
७३ वर्षीय जेना यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या मुख्यालयात पक्षाचे ओडिशाचे प्रभारी अजय कुमार यांच्या उपस्थितीत पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा हातात घेतला.
कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. आता देशात लोकसभा निवडणूक होते आहे. तसेच ओडिशात याचवर्षी विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. अशा वेळी जेना यांचे स्वगृही परतणे कॉंग्रेसला फायद्याचे ठरणार आहे.
दरम्यान, श्रीकांत जेना यांनी भारतीय जनता पार्टी आणि ओडिशातील बीजू जनता दल या दोन पक्षांवर टीका केली आहे. इंडिया आघाडी या पक्षांचा पराभव करेल असा आपल्याला विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला.
आपण सुरूवातीपासूनच कॉंग्रेसच्या विचारांचे होतो. मध्यंतरी काही गैरसमज झाले होते. ते आता दूर झाले आहेत. आपण कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आणि आज पक्षात परत आलो आहोत असेही ते म्हणाले.