कोलोंबो: श्रीलंकेचे माजी आरोग्य मंत्री रजिता सेनारत्ने यांना आज एका खासगी रुग्णालयातून अटक करण्यात आली. कुप्रसिद्ध “व्हाईत व्हॅन’ अपहरण प्रकरणी शुक्रवारी सेनारत्ना यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याबद्दल ही अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्षपदी गोटाबाये राजपक्षे यांची निवड झाल्यापासून महिन्याभराच्या आत अटक झालेले सेनारत्ने हे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत.
सेनारत्ने यांना गुरुवारी लंका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोलंबोच्या अतिरिक्त दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सेनारत्ना यांना रुग्णालयात भेट दिली आणि तपासासाठी 30 डिसेंबरपर्यंत ताब्यात घेण्यास मान्यता दिली. त्यानंतर युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी)चे सदस्य असलेल्या सेनारत्ने यांना श्रीलंकेच्या पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली.
16 नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत गोताबाया राजपक्षे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला, त्या दरम्यान सेनारत्ने यांच्यासह दोन माणसांनी 10 नोव्हेंबरला झालेल्या एका पत्रकार परिषदेत व्हाईट व्हॅन पथकांबद्दल भाष्य केले होते. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या 2005 ते 2015 च्या कारकिर्दीत या दोन व्यक्तींबरोबर सरकारी टीकाकारांचे अपहरण केल्याचे पत्रकार परिषदेत सेनारत्ना म्हणाले होते.
परिषदेत बोललेल्या इतर दोन जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. यापैकी का व्यक्तीने आपण ड्रायव्हर असल्याचा दावा केला होता. सेनारत्ने हे या प्रकरणातील तिसरे आरोपी आहेत. सेनारत्ने यांच्याविरोधात “सीआयडी’ने 24 डिसेंबरला अटक वॉरंट काढले होते. मात्र त्याच रात्री सेनारत्ने भूमिगत झाले होते.