कोल्हापूर – गेल्यावेळी जिल्हा परिषदेत आमचा निसटता पराभव झाला होता. यावेळी आम्ही सत्ता मिळविणार आहोत. महाडिकांची राजकारणातून कधीच एक्झिट झाली आहे. त्यांची पुन्हा एन्ट्री होईलच कशी, अशा शब्दात जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी पारंपरिक विरोधकावर निशाणा साधला. राज्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला. दरम्यान खबरदारी म्हणून दोन्ही कॉंग्रेसने आपल्या सदस्यांना आज दुपारी गोव्यात सहलीवर पाठवले.
2 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक होणार आहे. या निमिताने भाजप कडून सत्ता हिसकावून घेण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा निर्धार आहे. भाजपने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनच विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सदस्यांशी संपर्क सुरू केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही कॉंग्रेसने आपल्या सदस्यांना गोव्यात सहलीवर पाठवायचे नियोजन केले.
त्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासूनच जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे सदस्य शासकीय विश्रामधामात जमा होण्यास सुरूवात झाली. दुपारी सतेज पाटील शासकीय विश्रामधामावर आले. दोन्ही कॉंग्रेसच्या सदस्यांनी घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत केले. सतेज पाटील यांनी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संवाद साधला. आपण यावेळी जिल्हा परिषदेची सत्ता मिळविणारच असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर गटागटाने सदस्यांना दुपारी गोव्याला रवाना करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी 2 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. भाजप विरूध्द दोन्ही कॉंग्रेसची महाविकास आघाडी असा थेट सामना अपेक्षित आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम राखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष धनंजय महाडिक व त्यांचे सहकारी कामाला लागले आहेत. तर महाविकास आघाडीची मोट बांधून भाजपकडून सत्ता हिरावून घ्यायचा आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीम यांचा निर्धार आहे.
या प्रयत्नात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची त्यांना साथ आहे. शिवसेना नेते अरुण दूधवाडकर उद्या गुरुवारी कोल्हापुरात येत आहेत शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे . त्यामुळे शिवसेनाही महाविकास आघाडीत सामील होईल स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य घटक पक्षांची आम्हाला साथ आहे त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेत आम्ही विजयी होऊ ,असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. दोन्ही बाजूंनी जिल्हा परिषदेतील सत्ता प्रतिष्ठेचा विषय केला आहे.