कोलंबो :- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायके याला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याने श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना 2020 साली श्रीलंका प्रीमिअर लीगमधील काही सामने फिक्स करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने संघातील अन्य दोन खेळाडूंनाही त्यासाठी उद्युक्त केले होते, असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
याबाबत नोंदवण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत श्रीलंकेतील उच्च न्यायालयाने त्याला देश सोडून जाण्यास बंदी केली होती. सेनानायके याने मात्र, आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून अशा कोणत्याही गोष्टीत मी सहभाग घेतला नाही, असे सेनानायकेने म्हटले आहे.
सेनानायकेने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने श्रीलंकेकडून 49 एकदिवसीय सामन्यांत 53 बळी घेतले. त्याने 24 टी-20 सामने खेळताना 25 बळी घेतले आहेत.
त्याने श्रीलंकेकडून 1 कसोटी सामनाही खेळला आहे. यापूर्वीही त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून गोलंदाजी करण्यावरही बंदी लावण्यात आली होती.