पाकिस्तान : T-20 विश्वचषकातील खेळाडू फिक्सिंगच्या आरोपात दोषी

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेटला आता अजून एक धक्का बसलेला आहे. कारण पाकिस्तानकडून T-20 विश्वचषकातील खेळाडू आता फिक्सिंगच्या आरोपांमध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर पीसीबीने कडक कारवाई केल्याचे समोर आले आहे.

पीसीबीने सांगितले की, जीशान मलिकला फिक्सिंगच्या आरोपांखाली दोषी आढळला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. फिक्सिंगच्याबाबत कोणतीही माहिती जीशानने पीसीबीला दिली नव्हती.

यापूर्वी पाकिस्तानचा उमर अकमलवरही असेच फिक्सिंगचे आरोप ठेवण्यात आले होते आणि त्यामध्ये तो दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती, पण त्यानंतर त्याची शिक्षा कमी करत १८ महिने एवढी करण्यात आली होती. त्यानंतर उमरने पाकिस्तानच्या संघात पुनरागमनही केले होते.

जीशान आणि उमर यांचे प्रकरण सारखेच आहे. कारण जीशानने नॅशनल टी-२० चषकाच्या सामन्यातील फिक्सिंगची माहिती पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला दिली नव्हती. जीशान हा पाकिस्तानकडून २०१६ साली १९-वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता. या विश्वचषकात जीशानने ५६च्या सरासरीने २२५ धावा केल्या होत्या. त्यावेळी जीशानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे जीशान हा पाकिस्तानचे उज्वल भविष्य आहे, असेही म्हटले गेले होते.

पण जीशान हा आता फिक्सिंगच्या आरोपांखाली दोषी आढळला आहे. त्यामुळे आता किमान तीन वर्षे तरी तो खेळू शकणार नाही. या सर्व प्रकरणामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटमधील फिक्सिंगची कीड अजूनही संपलेली नसल्याचेच पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान हे माजी विश्वविजेते कर्णधार आहेत, तर पीसीबीचे अध्यक्षही माजी क्रिकेटपटू आहेत. पण तरीही पाकिस्तानचे क्रिकेट मात्र अद्याप सुधारलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.