मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची ओळख होती. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
मोहन रावले यांची ओळख ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती. ते कडवट शिवसैनिक होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मोहन रावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
मोहन रावले गेले.
कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते.
"परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला
विनम्र श्रद्धांजली… pic.twitter.com/cnVZzzmIKO— Sanjay Raut (@rautsanjay61) December 19, 2020
संजय राऊत यांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. “मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोहन रावले यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “मला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास समजलं की गोव्यात मोहन रावले यांचं निधन झालं. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या निवडणुकीचे नामांकन फॉर्म्स असायचे ते मी माझ्या हस्ताक्षरात भरत असे. रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ अंगरक्षक होते. लालबाग परळ भागातील अतिशय लोकप्रिय माणूस अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी मनस्वी शिवसैनिक आणि मित्र गमावला.”