पुणे(प्रतिनिधी) – ज्येष्ठ दाम्पत्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानेही फेटाळला. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.यु. मालवणकर यांनी याबाबत आदेश दिला आहे.
गुन्ह्याचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे पत्नीकडून सांगितले जात असतानाही जाधव यांनी अजय चड्डा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जाधव यांच्याविरोधात 12 गुन्हे दाखल असून, एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील ॲड. प्रदीप गेहलोत यांनी केला.
अजय चड्डा आणि ममता चड्डा हे दोघेही दुचाकीवरून औंध परिसरातून जात होते. त्यावेळी जाधव यांच्या गाडीचे दार अचानक उघडल्याने अपघात होऊन ममता त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्याचा जाब विचारण्यासाठी अजय हे गेले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, ममता यांनाही शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
या प्रकरणात चतृ:श्रृंगी पोलिसांनी जाधव यांना अटक केली आहे. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बचाव पक्षातर्फे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यास ॲड. गेहलोत यांनी विरोध केला.
ते युक्तीवादात म्हणाले, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. आरोपी आक्रमक स्वभावाचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार आणि त्यांचे कुटुंबियांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. मारहाण केल्यानंतर अजय जड्डा यांना मायनर ॲटक आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोपीने ज्या प्रकारे चड्डा यांना मारहाण केली त्यावरून त्याला कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जामीन फेटाळावा.