नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि आवामी मुस्लिम लीग पक्षाचे प्रमुख शेख रशिद यांना आज गेल्यावर्षी ९ मे रोजी झालेल्या दंगली प्रकरणी अटक करण्यात आली. रशिद यांच्यावर ९ मे रोजीच्या दंगली संदर्भात एकूण १४ कायदेशीर प्रकरणे दाखल आहेत. त्यासंदर्भातील जामिनासाठी ते आज दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये हजर झाले होते. त्यांना १४ पैकी १३ प्रकरणांमध्ये जामीन मंजूर झाला. मात्र न्यू टाऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी त्यांना जामीन नाकारण्यात आला.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप रशिद यांच्यावर होता. मात्र ९ मे रोजीच्या दंगलींनंतर रशिद यांनी इम्रान खान यांना अडमुठे म्हटले होते.
गेल्या काही दिवसांपासून रशिद भूमिगत होते. आपल्याला या कालावधीमध्ये कोणीही कोणतीही इजा पोचवली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपण नेहमीच पाकिस्तानच्या लष्कराला पाठिंबा दिला आहे. पाक लष्कराबद्दल चांगले बोलावे, असाच सल्ला आपण इम्रान खान यांना दिला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुका आपण तुरुंगातूनच लढवणार असल्याचे रशिद यांनी पूर्वीच जाहीर केले होते.