तिघांवर गुन्हा दाखल ः वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच शस्त्राने वार
पिंपरी – कॉंग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि.4) रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड येथील काकडे पार्क
परिसरात घडली.
या प्रकरणी गणेश नारायण लोंढे (वय-44, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोंढे हे कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. गणेश घोलप, आकाश घोलप (दोघे रा.तानाजीनगर, चिंचवड) व सुमित लव्हे (रा.काळेवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोंढे हे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून चिंचवड येथे गेले होते.
काकडे पार्क येथील शिवाजी उदय मंडळाजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना मोटारीबाहेर खेचून धारदार शस्त्राने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. त्यानंतर आरोपींनी पोबारा केला. यामध्ये लोंढे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गणेश लोंढे यांचा शुक्रवारी (दि.5) वाढदिवस होता. त्याच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.