सिडनीतही महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याचा प्रयत्न

हडपसर – परदेशात राहुनही आपल्या संस्कृतीचा वसा जपण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. याचे एक कारण म्हणजे बालपणापासून आपल्या संस्कृतीशी प्रत्येकाची जुळलेली नाळ. अशा वैभवसंपन्न आणि एकमेवाद्वितीय सुसंस्कृत परंपरांचे कोंदण पिढ्यान्‌पिढ्या आपल्यामध्ये रूजलेले आहे. या अमुल्य सुसंस्कृत आणि विधायक परंपरेता वसा ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी शहरात अशाच संस्कृतीत वाढलेल्या आणि नंतर या शहराला आपलसे करणाऱ्या महाराष्ट्रीयन मंडळींनी देखील हा वसा जपलेला पहावयास मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंदापूर निमगाव केतकी येथील भाऊसाहेब पाटील व हडपसरचे विशाल गोकुळे सांगतात की, जुन्नरचे सुपूत्र आणि सिडनीतील मराठी कम्युनिटीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व शरद भुजबळ यांनी ऑस्ट्रेलियामध्ये अवध्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करुया का, अशी कल्पना मांडली आणि सर्वांनी कसल्याही क्षणाचा विलंब न करता तयारी दाखवली. मग, भारतातून लहान मुलांसाठी ढोल, लेझीम, ताशे, झेंडे हे साहित्य आणण्यासाठी लगबग सुरू झाली.

सह्याद्री सिडनी या बाळासाहेब बनकर यांनी सुचविलेल्या संस्थेच्या नामकरणाचे भाऊसाहेब पाटील, शशिकांत धाडगे, पांडुरंग मटकर, श्रीकांत देवळे, विजय काळे, संतोष काशिद, अजय देशमुख, विशाल गोकुळे, निलेश डोंगरे आणि उमेश कदम यांनी स्वागत केले आणि सह्याद्री सिडनी इन्कार्पोरेटेड या संस्थेच्या माध्यमातून सिडनी ऑस्ट्रेलिया येथे मार्च 2013 मध्ये पहिली शिवजयंती साजरी झाली. काही दिवसानंतर योगेश चव्हाण, अण्णासाहेब कांदळकर, विक्रम पवार, महेंद्र गवाणकर, मंगेश चोरट, संजय लोहार ही कायम स्वयंसेवक म्हणून करणारी मंडळीही यामध्ये समाविष्ट झाली. यावर्षी देखील शिवजयंती सर्व बालगोपाळ, वरिष्ठ नागरिक, स्वयंसेवक आणि सिडनीतील सर्व महाराष्ट्रीयन मंडळी यांच्याबरोबर ढोल ताशांच्या गजरात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सह्याद्री अन्नपूर्णा टीमने बनविलेल्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

पदाधिकारी नसूनही संस्था सुरळीत
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सह्याद्री सिडनी इन्कार्पोरेटेडमध्ये पब्लिक ऑफिसर वगळता कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा बाकीचे पदाधिकारी नसूनही संस्थेचे कामकाज सर्व मेंबर्स सुरळीतपणे चालवतात. ऑस्ट्रेलियास्थित तमाम महाराष्ट्रीयन मंडळी आणि स्वयंस्फुर्तीने काम करणारे कार्यकर्ते हेच या संस्थेचा कणा आहेत. गेली 7 वर्षे सह्याद्री सिडनी आयोजित शिवजयंती आणि इतर उपक्रम हे फक्त आणि फक्त या संस्थेशी घट्ट नाते जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांमुळेच यशस्वी झाले आहेत. त्यांच्या सहभाग आणि सुचनांद्वारेच सह्याद्री सिडनी कायम वाटचाल करत आलेली आहे. जवळपास 50 ते 60 स्वयंसेवक हिरिरीने प्रत्येक उपक्रमात स्वत:ला झोकून देतात. प्रत्येकाची नावे येथे घेता येत नसली, तरी कार्यक्रम यशस्वी करणारे तेच खरे शिलेदार आहेत. या संस्थेने देशा-परदेशात देणगी स्वरुपात मदत केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.