सातारा – वखारीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याला सागवानाच्या वाहतुकीचा परवाना पास देण्यासाठी 14 हजारांची लाच स्वीकारणारा वनाधिकारी शंकर जगन्नाथ आवळे (रा. बाबर कॉलनी, शाहूपुरी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आवळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका वखार व्यवसायिकाला सागाची वाहतूक करण्याचा पास हवा होता. त्यासाठी वनाधिकारी शंकर आवळे याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दिली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणीबाबतची खात्री करून बुधवारी सापळा रचला. यावेळी आवळे याने 20 हजारांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती 14 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी त्याने दाखवली. त्यामुळे तक्रारदाराने आवळे याला 14 हजार रुपये दिले असता, एसीबीच्या पथकाने आवळेला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे येथील पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संजय साळुंखे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली.