पुणे – पर्यावरणपूरक पर्यटन (इको टुरिझम) अंतर्गत कामांना गती देऊन वन विभागातील 2 हजार 762 रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
वन विभागातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वन राज्यमंत्री भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता,
वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यावेळी उपस्थित होते. भरणे म्हणाले, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत इकोटुरिझमचे प्रस्ताव वन विभागाकडे आहेत या प्रस्तावासाठी निधीची आवश्यकता आहे हे लक्षात घेता याबाबत वित्त विभागाकडे वन विभागाने मागणी करावी.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मिरवडी, श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर, पुरंदर तालुक्यातील वाल्हा येथील श्री भवानीमाता परिसर, वाडे बोल्हाई या प्रलंबित प्रस्तावाबाबत वन विभागाने केलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.