नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः मैदानात उतरणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच तापू लागले असून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच निर्णय जाहीर केला आहे.
योगी आदित्यनाथ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नंतर विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले. त्यांनी आतापर्यंत एकदाही विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यावर्षी निवडणूक लढवल्यास ती त्यांची पहिली विधानसभा निवडणूक ठरेल.
अशातच अनेक सेलिब्रिटीमंडळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीत सहभागी होताना दिसत आहेत. काहींना तर राजकीय पक्षांकडून तिकीटदेखील मिळालंय. अशात आता कंगनाने एन्ट्री केली आहे. कंगना रनौतने एक फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यावर कुणी टिका केली तर कुणी पाठिंबा दिला आहे.
तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराचा फोटो शअर केला आहे. यात तिने योगी आदित्यनाथ यांच्या घराची तुलना मायावती, अखिलेश यादव यांच्या घरांशी केली आहे. यात तिने मायावती, अखिलेश यादव यांच्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांचं घर किती साधं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, कंगना उघडपणे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिसते. काही दिवसांपुर्वी कंगनाने योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतला होती.