पंतप्रधानांच्या ‘अब की बार ट्रम्प सरकार’वरून राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी हाऊदी मोदी या कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘अबकी बार ट्रम्प सरकार’च्या नाऱ्यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यावर आता राहुल गांधींनी ट्विट केले आहे. तसेच, तुम्ही यावर काम करत राहा आणि पंतप्रधानांना थोडीफार कूटनीती शिकवा, असा सल्लादेखील यावेळी राहुल गांधी यांनी दिला.
Thank you Mr Jaishankar for covering up our PM’s incompetence. His fawning endorsement caused serious problems with the Democrats for India. I hope it gets ironed out with your intervention. While you’re at it, do teach him a little bit about diplomacy.https://t.co/LfHIQGT4Ds
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 1, 2019
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये, ‘एस.जयशंकरजी यांचे आभार. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अक्षमता झाकून ठेवली. त्यांनी असे समर्थन केल्यामुळे भारतासाठी डेमोक्रेट्ससोबतच्या असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मला आशा आहे की, तुम्ही हस्तक्षेप केल्यास सर्व काही ठिक होईल. तुम्ही यावर काम करतच आहात तर त्यांना (पंतप्रधानांना) काही कूटनितीविषयी शिकवा’ म्हटले आहे. राहुल गांधी यांचे हे ट्विट आल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्टीकरण आले आहे. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाउडी मोदीमधील ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ ही घोषणा दिल्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीही राहुल गांधींसोबतच कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनीही हाउडी मोदींच्या विषयावर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी दुसऱ्या देशात गेले हे भारताचे विदेश धोरण नाही.