वॉशिंग्टन – अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तेथील विविध नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री मंत्री लॉइड ऑस्टिन यांच्याबरोबर संरक्षण सहकार्याच्या मुद्यावर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी पूर्व आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रातील अलीकडील घडामोडींसह विविध सुरक्षा मुद्द्यांवर दृष्टीकोनांची देवाणघेवाण केली, असे पेंटागॉनने म्हटले आहे.
त्यांनी वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी यावर्षी तंत्रज्ञान सहयोग आणि आर्थिक भागीदारीतील लक्षणीय प्रगतीचे कौतुक केले. या प्रगतीची गती वाढवण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली, असे जयशंकर म्हणाले.
एक दिवस अगोदर, जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जेक सुलिव्हन, व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई आणि परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या भेटी घेतल्या.
त्यांनी गुरुवारी यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम आणि यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलसह व्यापारी समुदायाशी संवाद साधला: अमेरिकेतील संसद सदस्य आणि थिंक टॅंकच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला.