वॉशिंग्टन: करोनामुळे झालेले व संभाव्य आर्थिक नुकसान लक्षात घेऊन आता अशियाई देशांतून विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आपले पैसे काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. याविषयी घेण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून एकूण 16 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. या रकमेसह विदेशी गुंतवणूकदारांनी आशियायी देशांतून काढून घेतलेल्या गुंतवणुकीची एकूण रक्कम 26 अब्ज डॉलर्सइतकी आहे.
करोनाचा जागतिक अर्थकारणावरील परिणमांच्या संबंधात रोज नवनवीन अहवाल येत असून त्यातील एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जगभरातीलच अर्थव्यवस्थेला करोनाचा फटका बसत असून अनेक देशांची अर्थव्यवस्था आता आकुंचन पावत आहे.
युरोपातील देशही याला अपवाद ठरलेले नाहीत. युरोपियन देशांचे आर्थिक आकारमान गेल्या तीन महिन्यात 3.8 टक्क्यांनी कमी झाले असून 1995 नंतर अशी वेळ युरोपांतील देशांमध्ये पहिल्यादांच आली आहे.
सन 2020 च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अमेरिकेचा जीडीपी 4.8 टक्क्यांनी कमी झाला आहे. जीडीपीतील ही घसरण थांबवण्यासाठी विविध देशांना अनेक वित्तीय आणि आर्थिक धोरणात्मक उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यातून आपल्या गुंतवणुकीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन विदेशी गुंतवणूकदारा मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेऊ लागले आहेत.
आशियायी देशांपैकी एकट्या भारतातून गेल्या दोन महिन्यात या गुंतवणूकदारांनी 16 अब्ज डॉलर्स काढून नेले आहेत. करोनामुळे अर्थव्यवस्थेचे जितके नुकसान होण्याचा अंदाज विविध संस्थांनी वर्तवला आहे त्यापेक्षा हे नुकसान कितीतरी अधिक असेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.