सीमाबंदीमुळे खेळाडूंचा सरावाला नकार

टेबलटेनिस महासंघ आयोजित करणार शिबिर

नवी दिल्ली – भारतीय टेबलटेनिस महासंघाने या महिन्याच्या अखेरपासून सराव शिबिरे सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात असे असले तरी देशात सीमाबंदी अद्याप कायम असल्याने राजधानी वगळता अन्य राज्यात राहात असलेल्या खेळाडूंनी या शिबिरात सहभागी होण्यास असमर्थता व्यक्‍त केली आहे.

करोनाचा धोका सुरू झाल्यापासून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सीमाबंदीदेखील लावली आहे. खेळाडूंनाच नव्हे तर सर्व देशवासीयांना सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे लागत आहे. एका राज्यातून परराज्यात जाण्यासाठी अत्यावश्‍यक कारणांव्यतिरिक्‍त परवानगीही मिळालेली नाही. अशा स्थितीत सराव शिबिरात सहभागी होता येणार नाही, असे उत्तर अचंता शरथ कमाल, मनिका बात्रा या अव्वल टेबल टेनिसपटूंनी महासंघाला कळवले आहे.

देशात चौथे लॉकडाऊन सुरू आहे. परिस्थितीत कधी बदल होईल व करोनाचा धोका कधी संपुष्टात येईल याबाबत अद्याप कोणीही सांगू शकत नाही. सध्या तरी सर्व परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहण्याशिवाय आपल्या हाती काहीच नाही. अशा स्थितीत सराव शिबिरात सहभागी कसे होता येईल. खरेतर करोनाचे संकट जवळपास 80 ते 90 टक्‍के कमी होईपर्यंत तरी शिबिर आयोजित केले जाऊ नये.

सीमाबंदी कायम आहे. हवाई प्रवासावर देखील बंदी आहे. जर राजधानीत शिबिर होणार असेल तर खेळाडूंनी आपापल्या शहरातून राजधानीत दाखल होण्यासाठी प्रवास कसा करायचा हाच मोठा प्रश्‍न आहे, असे मतही या खेळाडूंनी व्यक्‍त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.