आरटीओमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या फक्त घोषणाच
वाहनचालकांची खासगी वितरकांकडे धाव; तोडगा काढण्याची मागणी
पुणे – परिवहन विभागाने टोलनाक्यांवर “फास्टॅग’साठी महिनाभर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाहनांना “फास्टॅग’ बसवून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने “फास्टॅग’ उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले असूनही, प्रत्यक्षात पुणे आरटीओत उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, नागरिकांना खासगी वितरकांकडे धाव घ्यावी लागत असून अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होऊन ऑनलाइन पद्धतीने टोल वसुलीसाठी वाहनांना फास्टॅग बसवण्यात येत आहे. 15 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, फास्टॅग कार्यान्वित न केलेल्या वाहनधारकांची संख्या मोठी असल्याने अशांना पुढील महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे. या कारणाने फास्टॅग बसवून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, वाहनधारकांना फास्टॅग सहजपणे उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात फास्टॅग उपलब्ध नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक वाहनचालकांची ये-जा असणाऱ्या आरटीओ कार्यालयात फास्टॅग उपलब्ध का नाही? असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारण्यात येत आहे. महामार्ग प्राधिकरणाने आरटीओ कार्यालयात लवकरात-लवकर फास्टॅग उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
आरटीओ कार्यालयात नागरिकांना फास्टॅग उपलब्ध होण्यासाठी कार्यालयात काऊंटर सुरू करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आला आहे. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आरटीओने राज्य परिवहन कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.
– संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे