प्रति व्यक्ती 35 लिटरची कपात : अधिक वापर करणाऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे बिलाची वसुली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्यामध्ये अनेक बदल करताना प्रत्येक फ्लॅटसाठी केवळ चारशे लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे. एका फ्लॅटमध्ये साडेतीन ते चार रहिवाशी गृहीत धरून प्रति व्यक्ती केवळ शंभर लिटर पाणी पुरविले जाण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेकडून घेण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली.
शहरातील पाणीटंचाईवर तसेच अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांवर पालिका विविध उपाययोजना करीत आहे. शहरातील विविध सोसायट्यांना नळजोड देताना त्या ठिकाणच्या फ्लॅटच्या तुलनेत किती इंची कनेक्शन द्यायचे याबाबत निर्णय घेतला जातो. सध्या प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच व्यक्ती राहतात असे गृहीत धरण्यात येत असून परकॅपिटा 135 लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये अमुलाग्र बदल करण्यात येणार असून महापालिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार सोसायट्यांमधील रिकामे फ्लॅट, विभक्त पद्धतीमुळे फ्लॅटमध्ये राहणारांची कमी असलेली संख्या यामुळे प्रत्येक फ्लॅटमध्ये साडेतीन ते चार व्यक्तीच रहात असल्याचे स्पष्ट झाले होते.
या सर्व्हेक्षणाचा आधार घेऊन महापालिका प्रत्येक फ्लॅटमध्ये चार व्यक्ती गृहीत धरून प्रत्येक व्यक्तीसाठी शंभर लिटर या प्रमाणे चारशे लिटर पाणी पुरवठा करणार आहे. यापेक्षा अधिक पाणी वापर करणाऱ्या नळजोड धारकांवर थेट बाजारभावाप्रमाणे पाणी बिल आकारण्यात येणार आहे. नागरिकांना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची सवय लागावी तसेच समन्यायी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने प्रति व्यक्ती पाणी पुरवठा कमी करण्याबरोबरच मोठी दरवाढ लागू केली जाणार असल्याचेही लडकत म्हणाले.
गळतीचे प्रमाण मोठे
महापालिकेच्या पाणी वितरण वाहिन्यांमधून चाळीस टक्के पाण्याची गळती होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेकडून होत असलेल्या गळतीप्रमाणेच नागरिकांच्या घरात, सोसायट्यांमध्येही गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी पाणीगळती रोखण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.