कोल्हापूर नाका उड्डाणपूल बैठकीत प्रांताधिकाऱ्यांची ग्वाही
शाळांमध्ये प्रार्थना
कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल झाला पाहिजे ही मागणी आता जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कराड व मलकापूर शहरासह परिसरातील 100 शाळांमध्ये कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलासाठी गतीने काम व्हावे, यासाठी विद्यार्थी आपापल्या शाळेत विनवणी प्रार्थना करणार आहेत.
कराड – कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी कराड व मलकापूरसह परिसरातील नागरिकांनी उठाव केला आहे. हा उठाव आता चळवळ बनू लागलेला आहे. आज या प्रश्नाबाबत प्रशासनाची कृती समिती बरोबर बैठक पार पडली. या आंदोलनात आम्ही कृती समिती बरोबर नव्हे, तर त्यांच्या एक पाऊल पुढे असू, अशी ग्वाही प्रांताधिकारी उत्तम दिघे व पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल व्हावा, यासाठी प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी बुधवारी कृती समितीने बैठक आयोजित केली होती. यावेळी कृती समितीतील लोक उपस्थित होते.
प्रांताधिकारी दिघे म्हणाले, कोल्हापूर नाका येथे वाहतूक कोंडीसह अपघात होत आहेत. येथे उड्डाणपूल व्हावा, ही मागणी रास्तच असून कृती समितीचा हेतू चांगला आहे. त्यामुळे तो साध्य होईल. पूर्वी हा महामार्ग नॅशनल हायवे क्र. 4 होता. आता मात्र हा महामार्ग आशियाई मार्ग क्रमांक 47 झाला आहे. त्यामुळे या कामास थोडा विलंब होईल. पण उड्डाणपूल नक्की होईल, असेही दिघे यांनी सांगितले. कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल होणे गरजेचे आहे. कृती समितीने प्रशासनाकडे निवेदनामार्फत ज्या सूचना व मते मांडली आहेत. त्या सर्व सूचना जिल्हाधिकारी व हायवे अथोरिटी समोर मांडणार आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून न घेता प्रशासन तुमच्या नेहमी पाठीशी असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव म्हणाले, कोल्हापूर नाक्यावर होणारी वाहतूक कोंडीचा परिणाम मलकापूर व कराड मध्ये होत आहे. ट्राफिकसाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. यावर लवकरात लवकर मार्ग न निघाल्यास येणाऱ्या काळात करण्यामध्ये चालणे देखील मुश्कील होणार आहे. एवढी बिकट अवस्था कराड शहराच्या ट्रॅफिकची झालेली आहे. कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल झाल्यास बरेच ट्राफिक कमी होणार आहे. कृती समितीने महत्त्वाचा विषय उचलून धरला असून प्रशासन हे कृती समिती बरोबर नसून त्यांच्या पुढे एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत उड्डाण पुलाबाबत कृती समितीतील नागरिकांनी विचार मांडले. उड्डाणपूल होईपर्यंत कोणत्या उपाययोजना कराव्यात याच्याही सूचना मांडण्यात आल्या.