जगाचा करोनाशी लढा कायम, तर चीन व्यस्त विक्रमी निर्मितीकरणात
ग्वांगझू -चीनकडून जगभर पसरलेल्या करोनाचा लढा आज सर्व देश लढत आहेत. तर, दुसरीकडे जगाला व्यस्त ठेवून चीनमध्ये साकारत आहे जगातील सर्वात मोठे फुटबॉल मैदान. एकीकडे जगाला आगामी काळात काय करायचे आहे ते समजेनासे झाले आहे तर दुसरीकडे चीन विक्रमी निर्मितीत प्रगतशील वाटचाल करत आहे.
थोडेथोडके नाही तर जवळपास 15 हजार कोटी रुपये खर्चून चीन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. जगात सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे. याच खेळाचे जगातील सर्वात मोठे मैदान लवकरच स्पर्धांसाठी खुले होणार आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता 1 लाख आहे. हे मैदान पूर्ण तयार झाले की बार्सिलोनातील कॅम्प नाऊ या मैदानाला खालच्या क्रमांकावर ढकलून चीनमधील हे मैदान सर्वात मोठे ठरणार आहे. चीनमधील एवरग्रांड या रियल स्टेट समुहाकडून तयार केले जात असलेले ह मैदान 2022 साली पूर्णत्वाला येणार आहे.
चीनला 2023 सालच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून त्याचे उद्घाटन याच मैदानावर होणार आहे. कमळाच्या आकारात हे मैदान साकारत असून त्याच्या संकल्प चित्रातूनच त्याची भव्यता स्पष्ट होत आहे. ग्वांगझू हे शहर फुलांसाठी प्रसिद्ध असल्याने त्याचा आकार कमळाच्या फुलाप्रमाणे करण्यात आला आहे. जवळपास 4 लाख चौरस मीटर जागेत साकारत असलेल्या या मैदानात व्हीव्हीआयपी रूम, प्राइव्हेट रूम, खेळाडूंसाठी स्वतंत्र कक्ष तसेच माध्यमांसाठी खास मीडिया सेंटर तसेच अत्याधुनिक सुविधाही सज्ज होणार आहेत.