“अन्न-औषध’चा कारभार चार अधिकाऱ्यांच्या जिवावर

कबीर बोबडे
नगर – अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्ट्‌यीने सर्वात मोठा जिल्हा. जिल्ह्यात 14 तालुके आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन खात्याचं काम करण्यासाठी पूर्ण जिल्ह्यात चार अन्न निरीक्षक आहेत. यात नगर शहरासाठी एक अन्न निरीक्षक, तर तीन अन्न निरीक्षक इतर तालुक्‍याचं काम करतात.
शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावरील खाद्य पदार्थांची विक्री होत आहे.

यातील बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे परवाने नाही. सद्यस्थितीत शहरात दिल्लीगेट, माळीवाडा, आनंदी बाजार, कापड यासह सगळीकडे सर्रास उघड्यावरील खाद्य पदार्थांची विक्री होत असताना मनपा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून या बाबींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खाद्य पदार्थ विक्रेत्यांचं फावतं. शहरातील फुटपाथ तसेच रस्त्याच्या कडेला हात गाडा, दुकाने टाकून उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

चायनीज फूड, फास्ट फूड, वडापाव चूक गाड्या शहरात सगळीकडे दिसतात.
स्वच्छतेचे कुठलेही नियम खाद्य पदार्थ विक्रेते पाळत नाहीत. शहरात रस्त्याच्या कडेला हात गाडी टाकून व्यवसायिक उघड्यावर खाद्यपदार्थ बनवतात आणि विक्री करतात. पिण्यासाठी पाणी देखील स्वच्छ नसते. खाद्य पदार्थ बनवताना आणि खाद्य पदार्थांची विक्री करताना विक्रेत्यांकडे परवाना असणे गरजेचे आहे, परंतु बहुतांश लोकांकडे परवाना नाही.

रस्त्यावर खाद्य पदार्थ तयार करून त्याची विक्री करण्यास कायद्याने बंदी असतांना देखील उघड्यावर अन्न पदार्थ विक्री चालू आहे. उघड्यावर ठेवलेल्या पदार्थांवर दिवसभर घाणेरड्या माशा, रस्त्यावरील वाहनांमुळे उडणारी धुळ, वाहनांचा धुर, मातीच्या बारीक कणाचा थर या उघड्या पदार्थांवर येवून साचतो.

हे उघड्यावरील खाल्ल्‌यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी योग्य आहेत का, शिवाय, हे खाद्य पदार्थ बनवतांना स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, याची अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

परवाना नसलेल्या, उघड्यावर अन्न विक्री करणाऱ्यांवरील कारवाई
एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 या काळात अन्न प्रशासनाने 44 कारवाया केल्या. या केलेल्या कारवाया पैकी 34 प्रकरणे निकाली लागली. या केलेल्या कारवाया मधून 2 लाख 27 हजार 500 रुपये दंड वसूल केला.

भेसळ करणाऱ्यांवर केली कारवाई
दिवाळी तोंडावर आली असतांना बाजारात खाद्य पदार्थ विक्रीस आलेत. यात मोठ्या प्रमाणात भेसळ असू शकते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. अन्न व औषध प्रशासननाने धाडी टाकून खाद्य पदार्थांचे नमुने तपासून संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली. 30 ऑगष्ट ते 30 सप्टेंबर या काळात अन्न व औषध प्रशासनाने केवळ तीन कारवाई करून खवा, तूप, पनीर, रिफाईंड पालमोलिन तेल, रिफाईंड सोयाबीन तेल हे अन्न पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या अन्नसाठ्याची किंमत 2 लाख 54 हजार 545 होती.

अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत उत्पादक आणि पुरवठादार यांनी केवळ परवाना धारक विक्रेत्यांनाच माल पुरवला पाहिजे, असं होतं नसेल तर प्रशासनाकडून उत्पादक आणि पुरवठा यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे परवाना धारक विक्रेत्यांनाचं माल पुरवला पाहिजे. आणि जे विना परवाना व्यवसाय करत असतील त्यांनी तातडीने परवाने काढून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

संजय शिंदे सहाय्यक आयुक्त, परिमंडल -1, अन्न व औषध प्रशासन

Leave A Reply

Your email address will not be published.