पुणे, {संजय कडू} – आंतराष्ट्रीय ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करताना या रॅकेटचा व्यवहार हवालामार्फत सुरू असल्याचे पुढे आले. यामुळे हवाला व्यवहाराची “लिंक’ शोधण्यास गुन्हे शाखेने सुरुवात केली. यामध्ये पाच व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये दोन व्यापारी पुण्यातील, तर एक व्यापारी आणि दोघे सराफा व्यावसायिक दिल्लीतील आहेत. यांच्यामार्फत आजवर मुख्य आरोपी संदीप धुनिया ड्रग प्रकरणातील पैशांचे व्यवहार करत होता.
पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३,६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत केले. तसेच प्रकरणाच्या मुख्य आरोपी संदीप धुनियापर्यंत पोहचले. मात्र, धुनिया नेपाळमार्गे गल्फ कंट्रीतून लंडनला पळाला. या प्रकरणातील इतर महत्त्वाचे दुवे पुणे पोलिसांच्या हाती लागले.
यातील कंपनीचा मालक भिमाजी साबळे, फॉर्म्युला तयार करणारा अभियंता युवराज भुजबळ आणि स्थानिक वितरक हैदर शेख यांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक बाबी हाती लागल्या.
मात्र, कोट्यवधी रुपयांची उलाढाल कशी व्हायची, हे सुरुवातीला समजत नव्हते. तसेच प्रत्यक्षात कोणतीही मोठी रोकड आणि बँक व्यवहार हाती लागले नव्हते. या तपासात पोलिसांना संदीप धुनियाची दुसरी प्रेयसी सापडली. तिच्या चौकशीत ती ड्रगच्या व्यवहाराचे पैसे हवालामार्फत दिल्लीला पाठवत असल्याचे समजले आणि या रॅकेटची आर्थिक उलाढाल उलगडण्यास मदत झाली.
पोलिसांनी संदीप धुनियाच्या पहिल्या प्रेयसीची चौकशी केली. मात्र तिच्याकडील कागदपत्रांत काही विशेष हाती लागले नव्हते. दरम्यान, सध्यातरी पोलिसांनी धुनियाची दुसरी प्रेयसी आणि हवाला व्यापाऱ्यांपैकी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
…आणि सर्व धागेदोरे सापडले
संदीप धुनियाच्या दुसऱ्या प्रेयसीच्या चौकशीत पुण्यातील दोन हवाला व्यापाऱ्यांची माहिती मिळाली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी दिल्लीतील तिघांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. तेथे तिघांची चौकशी केली असता, त्यातील दोघे सराफा व्यापारी निघाले. दिल्लीतील हवालाची रोकड घेणारा व्यक्ती ही रोकड दोघा सराफांकडे द्यायचा. यानंतर ती रोकड संदीप धुनियाकडे लंडनला जात होती. ही सर्व लिंक पोलिसांना व्यवस्थित मिळाल्याने पोलिसांना आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
हवाला म्हणजे काय ?
हा व्यवसाय पूर्णतः विश्वासावर चालतो. किमान दोन एजंट आणि त्यांचे नेटवर्क असते. समजा तुम्हाला पुणे ते दिल्ली येथे सुमारे १०० कोटींची रोकड पोहोचवायची आहे. पण, बँकेद्वारे खूप चार्जेस द्यावे लागतात. तसेच तपास एजन्सीदेखील एवढा पैसा कुठून आला आणि कसा कमावला? असे प्रश्न विचारतील. अशा परिस्थितीत तुम्ही ते पैसे त्या व्यावसायिकाकडे पाठवाल, ज्याचे नेटवर्क दिल्लीतील एजंटकडे असेल.
तुम्ही पुण्यातील एजंटला १०० कोटी रुपये दिले, त्या बदल्यात एजंट तुम्हाला एक कोड देईल. हा कोड तुमचा पासवर्ड असेल, जो दिल्लीत बसलेल्या एजंटला मिळताच तो तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा उत्तर न देता १०० कोटी रुपये देईल. यालाच “हवाला’ व्यवसाय म्हणतात. या व्यवसायात एजंट एक लाख रुपयांच्या प्रत्येक व्यवहारासाठी काही रक्कम आकारतो, जे त्याच्या उत्पन्नाचे साधन आहे.