मंचर – सरकारने वाहतूक चलन (दंड) वाढवले आहे. नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाल्यास मशीनद्वारे दंड आकारतात. तो दंड सरकार जमा होतो, त्यामुळे वाहतूक नियम पाळा, नाहीतर दंड भरा. नागरिकांनी स्वतःची चूक असताना पोलिसांशी वाद घालू नये.
वाहनचालकाने ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवू नये. गाडीची कागदपत्रे सोबत ठेवावी. दुचाकी गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट वापरावे, तसेच गाडीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालायला सांगणे. गाडीचा इन्श्युरन्स अद्ययावत ठेवणे, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.
वाहने चालविण्याविषयी नवीन आलेल्या शासन अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथे वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी फाटा-पेठ येथील वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे,पोलीस जवान मंगेश लोखंडे, सोमजीत गवारी, राजकुमार सोनवणे, भीमा आहेर, शैलेश झुंजुरके, विशाल रोडे यांनी पुणे-नाशिक हमरस्त्यावरील मंचर येथे वाहनचालकांशी संवाद साधून जनजागृती केली.
याबाबत अधिक माहिती देताना सतीश होडगर म्हणाले की, स्वतःची गाडी दुसऱ्याला चालवण्यासाठी देऊ नका आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का पाहणे, दुचाकीवर दोनपेक्षा अधिक जणांनी बसू नये. जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढायच्या पात्रतेचा होत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका.
वाहनाला कर्कश्श हॉर्न बसवू नका. फोर व्हीलरला डार्क काळ्या काचा बसवू नका. गाडीची फ्रंट आणि बॅक लाईट आणि पुढील-मागील इंडिकेटर बंद किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करून घ्या. या नियमांचे पालन केल्यास वाहतूक नियमांचा भंग होणार नाही आणि आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही.
…अन्यथा कोर्टाचे पत्र तुमच्या पत्त्यावर
एखाद्या व्यक्तीला गाडी विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करून घेतली आहे का, ते पाहा. जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाइन दंड आपल्या नावावर (वाहतूक कोर्टचे पत्र) आपल्या घरी येणार.