नेवासा – तहसिलदार सुराणा यांची बदली झाल्यामुळे संजय बिरादार हे नवीन तहसिलदार म्हणून हजर झालेले असून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची बदली होऊन त्यांच्या जागी शिवाजी डोईफोडे यांनी पदभार स्वीकारून कामकाज सुरू केलेले आहे. नव्या गड्यांच्या दिलजमाईतून पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूक सुरू झाल्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांच्या आदेशाला महसूल आणि पोलीस खात्याकडूनच ठेंगा दाखविला जात आहे.
तत्कालीन तहसिलदार रुपेशकुमार सुराणा नेमणुकीस असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू उपसा करणारी बोट नेवासा दौऱ्यात पकडून दिल्यामुळे महसूल प्रशासनाच बोलतीच बंद केलेली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना जाब विचारला होता. या प्रकरणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली होती. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू उपसा बंद करून नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे.
सर्वसामान्याला परवडेल या दरात वाळू डेपोतून उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जात असल्यामुळे विखे पाटील यांच्या भूमिकेचे राज्यात स्वागत केले जात आहे. तर दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात नेवासा येथे मंत्री विखे यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत अवैध वाळू उपसा सुरू झाल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
तहसिलदार व पोलीस निरीक्षक हे दोन नवे गडी नेवाशात हजर होऊनही वाळू वाहतुकीवर कारवाई होण्याऐवजी पडद्याआडून हिरवा कंदिल दिल्यामुळेच वाळूचे वाहने सुसाट धावण्यास सुरुवात झाल्याचे प्रशासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळू उपसा राजरोज सुरू आहे.