लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे : डॉ. मोहन आगाशे

साहित्यिक कलावंत संमेलनात वाग्यज्ञ साहित्य व कला गौरव पुरस्कार सोहळा

पुणे – लोकसाहित्य हे अस्सल साहित्य आहे. पूर्वी सूर्यास्तानंतर मनोरंजनासाठी नृत्य, गायन आणि वाद्यवादन करत असत. या कलाविष्कारातून लोकसाहित्य निर्माण झाले. लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

 

 

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठनतर्फे आयोजित 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात वाग्यज्ञ साहित्य व कला गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

 

संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेडचे संचालक डॉ. श्रीधर राजपाठक, जनसंपर्क अधिकारी मकरंद पाचडे, अनिल देहडीराय, प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे उपस्थित होते.

 

 

डॉ. अरूणा ढेरे म्हणाल्या, संतांनी आपल्या अलौकीक साधनेद्वारे अध्यात्माची जी पातळी गाठली, त्या पातळीपर्यंत जनमानसाला घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील या संतांनी केला. कर्मकांड म्हणजे भक्तीमार्ग नाही, असे सांगून संतांनी जनसामान्यांना कर्मकांडापासून दूर केले.

 

 

मोहन जोशी म्हणाले, आजच्या तरूण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवातून शिकणे अपेक्षित आहे. ज्येष्ठांचे ऐकणे, त्यांच्या वाटेवरून चालणे हे पुढच्या पिढच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. प्रास्ताविक दिलीप बराटे, सूत्रसंचालन वि.दा. पिंगळे तर शाहीर बाबासाहेब जाधव यांनी आभार मानले.

 

 

परिसंवाद आणि भारूडांचे सादरीकरण

संमेलनातील ऑनलाइन कार्यक्रमात “जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि ’35 अ’ हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का?’ या विषयावरील परिसंवादात उल्हास पवार आणि माधव भांडारी सहभागी झाले होते. त्यानंतर भारुडातून प्रबोधन कार्यक्रम राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. समारोप प्रसंगी कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. त्यामध्ये रमण रणदिवे, ऐश्वर्य पाटेकर, शिवाजी सातपुते, मनोहर आंधळे, देवा झिंजाड, प्रशांत केंदळे, मृणालिनी कानिटकर आणि अस्मिता जोगदंड यांनी सादरीकरण केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.