‘FM Radio Center’ : कारागृह म्हटले कि त्यात चार भिंती आणि कोणतेही मनोरंजनाचे साधन नाही अशी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. मात्र या प्रतिमेला थोडी बगल देण्याचे काम राज्यतील एका कारागृह प्रशासनाने केले आहे. कारण आता कारागृहात देखील महिला कैद्यांचे देखील यापुढे मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे.
राज्यातील भायखळा तुरुंगाने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी ‘FM रेडीओ सेंटर’ची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहाने हा विशेष उपक्रम आयोजित केला आहे.
भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये पुरूष व महिला कैद्यांच्या मनोरंजनाकरीता ‘FM रेडीओ सेंटर’ हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. FM रेडीओ सेंटरमध्ये कारागृहातील महिला कैदी श्रध्दा चौगुले यांनी FM सेंटर मध्ये रेडिओ जॉकीची भूमिका पार पाडली आहे. यावेळी श्रध्दा चौगुले यांनीच अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांची रेडिओ FM वर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा व सोईसुविधेबाबत चर्चा केली.
दरम्यान, कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील कैदी असतात. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीच्या मनात नेहमी अस्वस्थता असते. आपलं कुटुंब, आपले भविष्य, आपली केस याबाबत नेहमीच प्रत्येक कैद्याला चिंता असते. त्यांच्या विचारामुळे प्रत्येक कैद्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. यातून थोडासा विरंगुळा म्हणून व कैद्यांना सकारात्मतेकडे नेण्याकरीता कारागृहात FM रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भायखळाआधी नागपूर आणि पुणे कारागृहातदेखील एफएम रेडिओ सेटंरची स्थापना करण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवत ‘FM रेडीओ सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘FM रेडीओ सेंटर’सह भायखळा तुरुंगात एक अनोखी अंगणवाडीदेखील सुरू आहे. तुरुंगातील कर्मचाऱ्यांसोबत कैद्यांची मुलेदेखील या अंगणवाडीत शिकतात. त्यामुळे भायखळा तुरुंगात बालकांच्या हसण्या-खेळण्याचा आवाज घुमतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ही अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे.