4 हजारांच्या बेंचची 14 हजारांना खरेदी; ठेकेदारावर कोट्यवधींचा चुराडा; सहायक आयुक्त चितळे अनभिज्ञ?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाकडून तिजोरीची लचकेतोड जोमात सुरू आहे. पुनर्प्रत्ययी आदेशाचा गैरवापर करत एकाच ठेकेदाराला पुन्हा 17 लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे मागणी आणि पुरवठ्याची मोडतोडही हा आदेश काढताना करण्यात आली आहे. तर उद्यान विभागासाठी पुरवण्यात येणाऱ्या बेंचमध्येही अनागोंदी करण्यात आली असून शासनाच्या “जीईएम’ या वेबसाईटवर चार हजारांना दर्शविण्यात येणारा बेंच तब्बल 12 हजार 981 रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या शेवटच्या सभेत प्रशासनाकडून आयत्यावेळी प्रस्ताव मांडून याला मंजुरी घेण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील दुही, भ्रष्ट व्यवहार, टक्केवारीतील भांडणांचा फायदा अधिकारी कशा पद्धतीने घेत आहेत, त्याचे उत्तम उदाहरण पालिकेच्या भांडार विभागाने सर्वांसमोर ठेवले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागासाठी 1500 ट्री गार्ड पुरविण्यात यावेत, अशी मागणी उद्यान विभागाकडून करण्यात आली होती. या मागणीचा आधार घेत भांडार विभागाने रेखा इंजिनिअरिंग वर्क्स, चिंचवड या ठेकेदाराला काम देण्यासाठी मागणीची मोडतोड केली आहे. पूर्वी खरेदी केलेल्या रक्कमेच्या तातडीच्या खरेदीसाठी पुनर्प्रत्ययी आदेश देण्याची तरतूद आहे.
रेखा इंजिनिअरिंग यांनी सप्टेंबर महिन्यात महापालिकेला 35 लाख 45 हजार 514 रुपयांचे बेंच पुरविले होते. या रक्कमेच्या बरोबरच पन्नास टक्के रक्कमेचे बेंच खरेदी करण्यासाठी 17 लाख 72 हजार 757 रुपयांचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे दीड हजार ऐवजी 1481 बेंच खरेदीची ऑर्डर दिली आहे. जुन्या खरेदीच्या निम्मी रक्कम बसविताना 1 रुपयादेखील इकडेतिकडे न करता ठरवून पन्नास टक्के रक्कम बसविण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारालाही या पूर्वी अशाच पद्धतीने पुनर्प्रत्ययी खरेदीचे आदेश दिले होते. त्याच विभागाचे काम आवश्यक असताना यापूर्वी वायसीएम रुग्णालयातील फर्निचरचा दाखला देत महापालिकेतील शाळांनासाठी बेंच खरेदी करण्यात आले होते. हा प्रकार सहायक आयुक्त चितळे यांच्या निदर्शनास आल्यानंतरही त्यांनी “चुप्पी’ साधल्यानंतर हा नवा पराक्रम भांडार विभागाकडून करण्यात आला आहे.
तर भांडार विभागाने याच दिवशी नवा पराक्रम करीत उद्यान विभागासाठी तब्बल 12 हजार 979 प्रति बेंचची खरेदी केली आहे. उद्यान विभागाने याची मागणी केली होती की नव्हती याबाबत या आदेशामध्ये कोणतीही स्पष्टता ठेवण्यात आलेली नसून या खरेदीसाठी 1 कोटी 94 लाख 68 हजारांची उधळपट्टी ठेकेदारावर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही निविदा प्रक्रिया “जीईएम’ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. याच वेबसाइटवर उद्यान विभागासाठी लागणारा बेंच केवळ 4 हजारांपर्यंत देऊ केलेला आहे.
“द्वारका इंडिया’ ही कंपनी तर आपल्या बेंचवर 83 टक्के डिस्काऊंट देण्यास तयार असून 3 हजार 125 रुपयांना हा बेंच देण्यास तयार असल्याचेही या शासकीय पोर्टलवर म्हटले आहे. संबंधित ठेकेदाराला आदेश देताना राज्य शासनाने 1 डिसेंबर 2016 रोजी दिलेल्या आदेशाचीही यामध्ये मोडतोड करण्यात आलेली आहे. दर निश्चिती करताना काळजी घ्यावी, असा आदेश असून कोणतेही टेंडर दहा टक्के रक्कमेपेक्षा अधिक असा 20 टक्के रक्कमेपेक्षा कमी असल्याने फेरनिविदा करावी, असे म्हटले आहे.
निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या कंपनीला काम देताना हा नियमही पायदळी तुडविण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे. रेखा इंजिनिअरिंग या कंपनीने 34.49 टक्के कमी तर निर्मिती इंजिनिअरिंग यांनी 34.59 टक्के कमी असा दर भरला आहे. इतर पाच ठेकेदारांनी मात्र 13 आणि 11 टक्के कमी तर एकाने पाच टक्के अधिकचा दर भरला आहे. या पाचही ठेकेदारांनी संगनमतानेच ही निविदा भरल्याचा संशयही व्यक्त होत आहे. ठराविक ठेकेदार पोसण्यात धन्यता मानण्यात मश्गूल असलेला भांडार विभाग सर्वसामान्यांकडून कररुपी जमा झालेल्या रक्कमेची उधळपट्टी थांबविणार तरी कधी? असा प्रश्न व्यक्त होत आहे.
“टीन 20’ची खरेदीही संशयास्पद
महापालिकेत सत्ताधारी गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून “टीन 20′ साठी किट खरेदी करण्यात आली होती. ही खरेदी करताना पुरवठाधारकाला केवळ दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. तर शॉर्ट निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळीही भांडार विभागाने लाखो रुपये ठेकेदारावर उधळले होते.
चौकशी करून सांगतो – चितळे
पुनर्प्रत्ययी आदेश आणि दिलेल्या पुरवठा आदेशाबाबत सध्या माझ्याकडे माहिती नाही. उद्या सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत योग्य उत्तर दिले जाईल तसेच या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रीया भांडार विभागाचे सहायक आयुक्त चितळे यांनी दिली.
तातडीबाबत माहिती नाही – पानसरे
संबंधित खरेदीबाबत भांडार विभागाचे मुबारक पानसरे यांच्याकडे विचारणा केली असता उद्यान विभागाने तातडीची मागणी केली होती का? याबाबत उद्या सकाळी सांगतो, असे सांगत उत्तर देणे टाळले. तर दीड हजारांऐवजी 1481 ट्री गार्ड का खरेदी केले? याबाबत उत्तर देण्याचे टाळले.