नगर – लोकसभा निवडणुकीचे काम पूर्ण करणार्या, मतमोजणीच्या कामात सहभागी होणार्या, तसेच बंदोबस्तासाठी असणारे पोलीस, होमगार्ड, एनसीसी छात्र, यासह क्षेत्रीय अधिकारी, आयकर अधिकारी यांना देण्यात येणार्या निवडणूक भत्त्याचे सुधारित दर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहेत.
नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघासाठी १९ ते २० हजार अधिकारी आणि कर्मचारी यांची लोकसभा निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. यात बंदोबस्ता असणार्या पोलीस यंत्रणेसह, होमगार्ड आणि अन्य संस्थांच्या प्रतिनिधी यांचा समावेश नाही. त्यांची संख्या ही वेगळी आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या सुधारित दरानूसार लोकसभा निवडणुकीत काम करणार्या क्षेत्रिय दंडाधिकारी यांना एकत्रित १ हजार ५०० रुपये, मतदान केंद्राध्यक्ष- मतमोजणी पर्यवेक्षक यांना प्रती दिन ३५० रुपये अथवा दिवसाच्या भागासाठी, मतदान अधिकारी आणि मतमोजणी सहायक यांना २५० रुपये प्रती दिन अथवा दिवसाच्या भागासाठी, चर्तुथश्रेणी कर्मचारी यांना २०० रुपये प्रती दिन यासह फिरते व्हिडीओपथक, व्हिडीओ निरिक्षण पथक (वर्ग 1 आणि वर्ग २) यांना १ हजार २०० रुपये एकत्रित, लेखापथक, नियंत्रण कक्षात काम करणारे, कॉल सेंटरमधील कर्मचारी, प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख ठेवणारी यंत्रणा, फिरथे पथक, खर्च नियंत्रण सेल (वर्ग 3) यांना १ हजार रुपये एकत्रित आणि वर्ग ४ च्या कर्मचार्यांना प्रती दिन २०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. यासह आयकर निरिक्षक यांना १ हजार २०० रुपये, सुक्षम निरिक्षक यांना १ हजार रुपये भत्ता मंजूर करण्यात आला आहे.
या सुधारित दरानूसार लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार्यांना भत्ते अदा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काही निवडणूक दरात सुधारणा करण्याचे पत्र राज्य सरकारला दिले होते. त्यानूसार निवडणूक भत्त्यात सुधारणा करून राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नवीन दर गुरूवारी (दि.१८) जाहीर केलेले आहेत.
जेवणासाठी १५० रुपये भत्ता
लोकसभा निवडणुकीदरम्यान एका दिवसासाठी अथवा जेवणाच्या पाकिटासाठी १५० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. यात मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, ग्राम सुरक्षा रक्षक. मोबाईल पथक, होमगार्ड, माजी सैनिक, स्वयंसेवक यांना १५० रुपये प्रमाणे जेवणाचा भत्ता देण्यात येणार आहे.