पुणे – पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) ओला (मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि.) आणि उबेर (मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि.) कंपन्यांचा अॅग्रिगेटर (ऑनलाइन प्रवासी वाहतूक) परवाना नाकारल्यानंतर त्यांनी स्टेट अपिलेट ट्रिब्युनलकडे अपील केले आहे. त्यावर दि. १८ जून रोजी सुनावणी होणार आहे.
पुणे आरटीओकडे अॅग्रिगेटरर परवान्यासाठी काही कंपन्यांसह ओला व उबेरने अर्ज केले होते. सर्वांनी अॅग्रिगेटरच्या तरतुदींचे पालन न केल्यामुळे ओला व उबेर व्यतिरिक्त कंपन्यांचा परवाना नाकारला होता. तर, ओला व उबेरचे अर्ज राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यांना त्रुटीची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते.
ओला व उबेर कंपन्यांकडून अॅग्रिगेटर परवान्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता न केल्यामुळे त्यांचा गेल्या महिन्यात परवाना नाकारला होता. या निर्णयावर अपील करण्यास महिन्याची मुदत दिली होती. त्यानुसार अगोदर ओलाने अपील केले होते. यावर पुणे आरटीओने त्यांचे म्हणणे सादर केले. पण, त्यानंतर आता उबरनेदेखील अपील केले आहे. त्यावर पुणे आरटीओला १० जूनपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश स्टेट अपिलेट ट्रिब्युनलने दिले आहेत.