नवी दिल्ली – तीन दिवसांत दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे यावेळी दिग्गज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरही या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित आहेत. तत्पूर्वी शनिवारी बैठक झाली होती.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शनिवारी काँग्रेस पक्षाची बैठक सुमारे चार तास चालली होती. बैठकीत प्रशांत किशोर यांनी नेत्यांना प्रेझेंटेशन दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले होते की, प्रशांत किशोर यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काही बड्या नेत्यांसमोर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत प्रेझेंटेशन मांडले होते. या प्रेझेंटेशनचा आढावा घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात येणार असून, ती काही वेळानंतर आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.