बंगळुरू – केंद्रीय गुन्हे शाखेने बंगळुरात पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि स्फोटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासह बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. एका खुनाच्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 21 जणांपैकी हे पाच जण असून ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे,
सुल्तानपल्या परिसरातील कनकनगर भागातील एका प्रार्थनास्थळाजवळ एक कट रचण्यासाठी ते जमले होते त्यावेळी त्यांना पकडण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.हे लोक तेथे जमल्याची माहिती गुन्हे शाखेला गुप्तचर सूत्रांकडून मिळाली होती.
सध्या फरार असलेला एक मुख्य सूत्रधार या पाच जणांशी फोनवर संपर्कात असल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची अन्य माहिती मिळवण्याचे प्रयत्न जारी आहेत. त्यांची नावे मात्र अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत.