शिरूर तालुक्यात हार्वेस्टरच्या व्यवसायासाठी पिस्तुलाने धमकावल्याचा प्रकार
शिक्रापूर – शिरूर तालुक्यात यापूर्वी औद्योगिक वसाहतीत यापूर्वी अनेकदा ठेक्याचे मोठमोठे वाद व्हायचे. यामध्ये कित्येकदा तलवार, कोयते, पिस्तूल, हॉकीचा वापर होऊन हे वाद विकोपाला जाण्याच्या घटना घडत आहेत. आता तर शिरूर तालुक्यात शेतातील गहू काढणीच्या हार्वेस्टरच्या व्यवसायासाठी पिस्तुलाचा वापर होत असल्याने खळबळ उडाली आहे.
शिरूर तालुका औद्योगिक वसाहत तसेच शेतीचा तालुका म्हणून ओळखला जात असून येथील औद्योगिक वसाहतीमुळे जमिनीला आलेला सोन्याचा भाव तसेच कारखानदारी मध्ये मिळणारे ठेके यासाठी अनेकांमध्ये वाद होत असताना यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा देखील हस्तक्षेप उघड झालेले आहे. या माध्यमातून अनेक गट, ग्रुप व टोळ्या निर्माण होऊन संघर्षासाठी होणारे वाद विकोपाला गेले आहेत, या व्यावसायिक संघर्षातून कित्येकदा गोळीबार, तलवार कोयत्याचे वार तसेच हॉकीने हाणामारी या सारख्या घटना वाढतच आहेत. यामध्ये गुंठेवारीची देखील भर पडल्याने त्यातून सुद्धा वादावादीचे प्रकार घडून आले.
सध्या शिरूर तालुक्यात गहू व ऊस तोडणीच्या हार्वेस्टर मशीनचा व्यवसाय मोठ्या तेजीत सुरु असताना यामध्ये देखील संघर्ष सुरू झालेला आहे. नुकतेच मुखई येथे एका स्थानिक हार्वेस्टर मशीन चालकाने बाहेरुन आलेल्या मशीन चालकावर या भागात यायचेच नाही, असे म्हणत त्याच्यावर पिस्तूल रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही व्यावसायिक पोलीस स्टेशनमध्ये आले असता. मशीन चालकाकडे परवाना धारक पिस्तूल असल्याने उघड झाले; मात्र स्थानिक गावातील पुढारी तसेच या भागातून नव्याने अधिकारी झालेले काही यांनी हस्तक्षेप केल्याने कोणत्याची स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला नाही.
परवाना असला म्हणनू धमकावयाचे?
परवाना असला तरी व्यवसायासाठी धमकावणे योग्य आहे का असा प्रश्न नागरिकांना पडू लागला असून गंभीर प्रकार घडून देखील पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका अशीच राहिली तर पुढील काळात या व्यावसायिक संघर्षातून मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परवानाधारकांकडे प्रशासनाच्या नियंत्रणाची गरज
शिरूर तालुक्यात अनेक पिस्तुल परवाना धारक नागरिक व व्यावसायिक असून त्यांच्याजवळील पिस्तुल ते नेमके कशासाठी वापरतात त्यांच्या जीविताला नक्की धोका आहे का याबाबतची माहिती घेऊन या परवाना धारकांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.