श्रीगोंद्याच्या विकासासाठी पाचपुतेंना बळ : राजेंद्र नागवडे  

श्रीगोंदे – कुकडी आणि घोड हक्काच्या पाण्यासाठी तसेच जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेच्या पूर्णत्वासाठी पाचपुतेंना साथ दिली आहे. तालुक्‍यातील प्रलंबित प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सुटणार आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना वेठीस धरणारा गेल्या चाळीस वर्षांचा नागवडे – पाचपुते संघर्ष थांबविला असून पाचपुतेंना बळ देण्याचा निर्णय घेतल्याचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ आढळगाव येथे झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी देवराव शिंदे होते. यावेळी पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, डॉ. सुनिल भोस, रमेश गिरमकर, दत्तात्रय कोठारे, जिजाराम डोके, उपसरपंच विजय वाकडे, भाऊसाहेब बोत्रे, बळीराम बोडखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागवडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघाच्या हितासाठी पाचपुतेंना साथ देण्याचा आग्रह केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांना निवडून दिले त्यांनी तालुक्‍याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विकास खुंटला. आता तालुक्‍यातील शेतीच्या भल्यासाठी पाचपुतेंना निवडून देण्याचे आवाहन केले.

पाचपुते म्हणाले, कुकडी कारखाना वाचविण्यासाठी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगणाऱ्यांनी कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी करणारांच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत. गेल्या पाच वर्षांत विधानसभेत तोंडही न उघडणारांनी तालुक्‍याचा लौकिक धुळीस मिळविला आहे. मी पालकमंत्री असताना कर्जत जामखेडचे त्यावेळचे आमदार राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्यासाठी रॉकेल ओतून घेतले, आपल्या आमदारांनी काहीच केले नाही. 2014 साली तालुक्‍यात पाण्याच्या योग्य नियोजनामुळे चार साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु होते, तर यावर्षी एकही कारखाना ऊसाअभावी सुरु होणार नाही. अशी स्थिती आमदारांच्या निष्क्रीयतेमुळे झाली आहे.
प्रा. तुकाराम दरेकर यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्यावर टिका केली. सभेचे सुत्रसंचालन अनिल ठवाळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.