इस्लामपूर(प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी आदेशाचा भंग करून करोनाबाधित कंटेंटमेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या मालकीची सरकारी घंटागाडी वापरून दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव रामचंद्र जाधव याच्यासह सतीश बबन मंडले, सुनील सावळाराम जाधव, सागर जाधव व राजभवन बिअर बारचे मालक अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याप्रकरणी मुख्याधिकारी प्रज्ञा शंकराव पोतदार-पवार यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड विनिमयमन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी २८ एप्रिलला दुपारी बाराच्या दरम्यान करोनाबाधित क्षेत्रांमध्ये राजभवन बिअर बारच्या आवारातून नगरपालिकेच्या शासकीय घंटागाडीतून दारू साठा इतरत्र हलवण्यात येत होता. लॉकडाऊन असताना आणि दारू विक्रीचा परवाना नसताना राजभवन बिअर बारमधून दारूची वाहतूक केली जात होती.
बाधीत क्षेत्रामध्ये कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी नेमलेली आहे. असे असताना या परिसरात अन्य दुसरी घंटागाडी (एम एच १० सीआर २६४८) या गाडीवरील चालक सतीश बबन मंडले व सहाय्यक सुनील सावळाराम जाधव व सागर जाधव यांनी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्याशी संगनमत करून दारूसाठा इतरत्र हलवला. नगरसेवक खंडेराव जाधव याने आपल्या पदाचाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशांचा भंग करून करोना बाधित क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठीचे निमित्त साधून अनधिकृतपणे दुसरी घंटागाडी नेत दारू वाहतूक केल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.