हिंगोली: राज्य राखीव बलातील नवीन 5 जवानांचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात आले आहे. येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवानांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यातील 2 जवान हे मुंबई येथे तर 10 जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. तर 1 व्यक्ती जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास “कोविड-19′ ची लागण झाली आहे. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ही 13 झाली आहे.
जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील करोना (कोविड-19) ची लागण झालेला जवान हिंगोली येथील राहत असलेल्या गावातील परिसरात व त्याच्या निकटतम संपर्कातील आलेल्या 95 व्यक्तींना विलगीकरणामध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचा थ्रोट स्वॅब अहवाल तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्यापैकी 28 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापैकी 27 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित अहवाल प्रलंबित आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 932 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 602 रुग्ण भरती असून, 303 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 13 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 616 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 330 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.