बॅंक चोरांमध्ये बहुतेकजण भाजपचेच मित्र – राहुल गांधी यांचा दावा

म्हणून माहिती लपवत होते

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने आज बॅंकांना बुडवणाऱ्या 50 प्रमुख कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे त्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. त्या संबंधात ट्विटरवरून दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधी यांनी म्हटल आहे की, संसदेत मी अत्यंत साधा प्रश्‍न विचारला होता. त्यात देशातील पन्नास प्रमुख कर्जबुडवे कोण आहेत याची यादी द्या, असे मी सरकारला सांगितले होते. अर्थमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले नाही. आज जाहीर झालेल्या आरबीआयच्या यादीत मेहुल चोकसी, नीरव मोदींसह अनेक भाजप मित्रांचीच नावे समोर आली आहेत. म्हणूनच संसदेत ही माहिती देण्यास सरकार कचरत होते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

या कर्जबुडव्यांची तब्बल 68 हजार 607 कोटी रुपयांची कर्जे सरकारने माफ केली आहेत. त्यात मेहुल चोकसी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांचा समावेश आहे. सरकारने सन 2014 पासून 2019 पर्यंत या बड्या लोकांची तब्बल 6 लाख 66 हजार रुपयांची कर्ज माफ केली आहेत.

आरबीआयकडून माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारची लबाडी यातून उघड झाली आहे. सत्य कधीच लपू शकत नाही याचाच धडा आज मोदी सरकारला मिळाला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.