कराड -मलकापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी नगरविकास विभागाकडून सुमारे 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारसीमुळे हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकातील माहिती अशी, मलकापूर नगरपरिषदेने नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरु केले आहे. सध्या हे काम 75 टक्के पूर्ण झालेले आहे. मलकापूर परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी प्रशासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मध्यवर्ती कार्यालय असावे ही बाब विचारात घेऊन या जागेची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आगाऊ ताबा दिला व तत्कालीन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सदरची जागा मलकापूर नगरपरिषदेच्या नावे करण्याचे आदेश दिले. परंतु, काहींनी याबाबत शासनाकडे व न्यायालयामध्ये तक्रारी करुन सदर इमारतीचे काम पूर्ण होऊ नये याकरीता अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरपालिकेने सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सदरची जागा ताब्यात घेतली.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये संसद भवनाच्या धरतीवर नाविण्यपूर्ण अशी ही इमारत साकारत आहे. या इमारतीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे 7 कोटीचा निधी मंजूर केला होता. या इमारतीसाठी अधिक निधीची आवश्यकता असल्यामुळे निधीची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने इमारतीसाठी 1 कोटीचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला होता.
सदर इमारतीमधील उर्वरित कामाकरीता 5 कोटी निधीची आवश्यकता होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यांनी 5 कोटी निधी मंजूर करण्याबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाने सुमारे 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे.
नगरपरिषदेचे उर्वरित काम डिसेंबर 2020 अखेर पूर्ण होऊन सन 2021 या सालामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये एकत्रित सर्व विभागाचे कामकाज सुरु करण्याचा मनोदय असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी म्हंटले आहे. सदर निधी मंजूर करणेकामी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आ. पृथ्वीराज चव्हाण, ना. सतेज पाटील, ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभुराजे देसाई, ना. विश्वजीत कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.