वॉशिंग्टन- प्रशांत महासागरामध्ये आपल्या 11 अण्वस्त्रसज्ज विमानवाहू नौकांपैकी तीन विमानवाहू नौका तैनात केल्या गेल्या आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. जगातील कोणत्याही देशाला प्रतिक्रिया म्हणून या नौका तैनात केलेल्या नाहीत. तर सुरक्षितता, स्थैर्य आणि समृद्धतेला इंडो-पॅसिफिक भागात अबाधित राखण्यासाठीच तैनात केल्या गेलेल्या आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या नौदलाच्या सातव्या तुकडीचे प्रवक्तेम रेयान मॅमसेन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. अमेरिकेचे नौदल आपत्कालिन स्थितीमध्ये कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सदैव सज्ज असते. पॅसिफिक आणि पॅसिफिक महासागराच्या पश्चि मेकडील सागरी भागामध्ये मित्र आणि सहकारी देशांच्या मदतीला या नौका कायम उपलब्ध असतील, असेही त्यांनी म्हटले आहे. हा भाग दक्षिण चीन समुद्र, पूर्व चीन समुद्र आणि फिलिपाईन्सच्या समुद्राला लागूनच असल्याने या विमानवाहू नौका तेथे तैनात करण्यामागील अमेरिकेचा हेतू स्पष्ट आहे. या भागात अमेरिकेचे नौदल 75 वर्षांपूर्वीपासून असल्याचेही मॅमसेन यांनी म्हटले आहे.
यूएसएस रोनाल्ड रेगन आणि यूएसएस थिओडोर रुझवेल्ट हे पॅसिफिक महासागराच्या पश्चिमम भागात गस्त घालत आहेत. तर यूएसएस निमित्झ पूर्व भागात गस्त घालत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या विमानवाहू नौका पॅसिफिक महासागरामध्ये तैनात करण्याला चीनकडून 15 जून रोजी प्रथमच आक्षेप घेण्यात आला आहे. या भागातील आपल्या अधिकारांबाबत चीन काहीही आगळीक खपवून घेणार नाही, असे चीनने म्हटले आहे.
———————–