जामखेड -तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून बेकायदेशीर रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन चाललेल्या ट्रकवर कारवाई करण्यात याली. याप्रकरणी पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानदारासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
करोना संक्रमण काळातच तालुक्यातील सोनेगाव येथून स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी ट्रक गुजरातकडे जात होता. जामखेड पोलिसांनी चौंडी परीसरात सापळा रचून हा ट्रक पकडला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह दोघांना ताब्यात घेतले होते. महसूल विभागाचे निरीक्षक रवींद्र शामराव बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक शशिकांत भीमराव गवळी (रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यासह चालक संदीप सुनील लोंढे (रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर), सुभाष नारायण दहिटकर (रा. वैराग, जि. सोलापूर), मंदा सुग्रीव वायकर व सुग्रीव नारायण वायकर (दोघे रा. सोनेगाव, ता. जामखेड) अशा पाच जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शशिकांत गवळी व संदीपान लोंढे यांनी सुभाष दहिटणकर याने तयार केलेल्या बनावट बिल्टीचा वापर करुन मंदा सुग्रीव वायकर यांच्या सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा 24 टन तांदूळ घेतला. तसेच तो काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात होता. याबाबात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला. तसेच वरील पाच जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकसह पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांबाबत जनतेच्या तक्रारी आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानावर छापा टाकला होता. त्यानंतर पुन्हा सोनेगाव येथील काळ्याबाजारात जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला. त्यामुळे तालुका पुरवठा विभाग काय करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.