नगर -शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी एक महिलाही करोनाबाधित असून, ती पुणे येथे राहात आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातही पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आज एकाच दिवशी 15 रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 133 वर गेली आहे.
शहरातील सथ्था कॉलनीतील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती करोनाबाधित आढळल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत कॉलनीत जाणारे दोन्ही रस्त्यांवर बॅरिकेडिंग केली आहे. या कॉलनीतील नागरिकांना बाहेर जाण्यास आणि इतर नागरिकांना कॉलनीत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
सथ्था कॉलनीतील एका मोठ्या कुटुंबातील वृद्ध महिलेला सर्दी, ताप ही लक्षणे आढळल्याने त्या महिलेस पुण्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी खाजगी लॅबमध्ये या महिलेची करोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली. ही माहिती जिल्हा प्रशासनाला समजल्यावर प्रशासनाने त्या महिलेच्या घरातील 13 जणांना शुक्रवारी (दि.29) दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात नेवून त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले होते. त्यापैकी महिला व चार पुरुष, अशा एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. महिलेवर पुण्यात, तर अन्य चार जणांवर शहरात विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
प्रशासन सतर्क; संपर्कातील व्यक्तींचा शोध
शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती करोनाबाधित आढळल्याने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या समवेत सथ्था कॉलनी परिसराची पाहणी केली. तसेच हा परिसर तातडीने सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सथ्था कॉलनीत कोठी रोडच्या बाजूने येणारा रस्ता बंद करण्यात आला असून, स्टेशन रोडच्या बाजूने असलेला रस्ता फक्त प्रशासकीय यंत्रणेसाठी चालू ठेवण्यात आला आहे. परिसरात औषध फवारणी व या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे.