भिगवण – इंदापूर तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीप्रमाणेच मासेमारी व्यावसायवरदेखील अवलंबून आहे. करोनामुळे मासेमारी व मासळी बाजार बंद करण्यात आला आहे. शासनाने परवानगी देऊनही मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांची घुसमट होत आहे.
मासेमारी ही अन्नपुरवठ्याच्या दृष्टीने जीवनावश्यक बाब आहे. मागील सुमारे दिड महिना मासेमारी बंद असल्याने मच्छिमार कुटुंबीयांवर बेकारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. केवळ रेशनिंगच्या धान्यावर कुटुंब चालविणे मुश्किल आहे. लॉकडाऊनमुळे उजनी काठावरील मच्छिमारांची देखील माश्यांना बाजार उपलब्ध नसल्याने मच्छीमारांची दयनीय अवस्था झाली आहे.
सध्या मासेमारी करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे, मात्र मार्केट बंद असल्याने पकडलेला मासा विकायचा कुठं हा प्रश्न मच्छीमारोसमोर उभा आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील उजनी काठावरील अनेक मच्छीमार मासे पकडून इंदापूर तालुक्यातील इतर गावात विक्री करत आहेत.
काही मच्छीमारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून फोनवरच ऑर्डर घेऊन मासे घरपोच देण्यास सुरुवात केली आहे. यातून कसातरी रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. करोनामुळे उजनी काठावरील मच्छीमारांची जगण्यासाठी धडपड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हॉटेल चालकाकडून उजनीतील मासा मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, मात्र इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल बंद आहेत. शिवाय मार्केट बंद असल्यामुळे उजनीतून पकडलेला मासा तालुक्यातील इतर गावात नेऊन विक्री करण्याची वेळ मच्छिमारांवर आली आहे. मच्छीमार अगदी सकाळी सकाळी मासे घेऊन इतर गावात मासे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर मच्छीमारांना मासेमारीतून चांगला फायदा होईल, असे स्थानिक मच्छीमार सांगत आहेत.