पुणे : लॉकडाऊन मुळे यवतमाळ येथे घरी पायी निघालेल्या युवकाला पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालया जवळील संगमब्रीज परिसरात लुटण्याचा प्रकार घडला आहे. या बाबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून धानोरी येथील सुमीत यादव यांच्यासह पाटील इस्टेट भागातील स्थानिक युवकांनी या या यवतमाळच्या युवकाला वाचविले आहे.
पुण्यात कामा निमित्ताने राहत असलेला हा युवक लॉकडाऊन सुरु असल्याने तसेच पुण्यात उपासमार होत असल्याने घरी निघालेला होता. रात्रीच्या वेळी तो अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आला असता काही युवकांनी त्याचा मोबाईल तसेच त्याचे साहित्य हिसकवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला मारहाणही केली. त्यावेळी यादव हे त्या रस्त्याने जात होते. त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीनं गाडी थांबवित या युवकाला मदत केली. तर यादव हे थांबताच इतर युवक पळून गेले.
मात्र, या प्रकाराने यवतमाळ येथे निघालेला तरुण चांगलाच घाबरलेला असल्याचे या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधीच लॉकडाऊन मुळे उपासमार होत असल्याने घरी जाताना रात्रीच्या वेळी लूटमार होत असल्याने या नागरिकाना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे पोलीस तसेच प्रशासनाने तातडीनं याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सुमीत यादव यांनी या व्हडिओ मध्ये केली आहे.