मुंबई – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 116 व्या जयंतीपूर्वी त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या डिजिटल मोहिमेचा एक भाग म्हणून हा माहितीपट बनवला आहे.
या माहितीपटात त्यांच्या कारकिर्दीची तसेच त्यांच्या संपूर्ण प्रवासाची कथा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 सालच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ध्यानचंद यांनी 1926 ते 1949 या कालावधीत 185 सामन्यांमध्ये 570 गोल केले.
1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशात साजरा केला जातो.
या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाला मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नाव देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना भारतरत्नही देण्यात यावा या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.