वॉशिंग्टन – काबूल विमानतळावर आज सकाळी 5 रॉकेटचा मारा झाला. मात्र अमेरिकेच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ही रॉकेट पाडली. अमेरिकेच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या रॉकेट हल्ल्यात अमेरिकेची कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमेरिकेच्या फौजांनी सी-रॅम या रॉकेट विरोधी प्रणालीचा आणि मोर्टार सिस्टीमचा वापर करून ही रॉकेट हवेतच रोखली, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले. या रॉकेटच्या विरोधात जेंव्हा सी-रॅम प्रणालीचा वापर केला गेला तेंव्हा संपूर्ण शहरात ड्रिलींगसारखा आवाज घुमला होता.
अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीची प्रक्रिया सुरू असतानाही काबूल विमानतळावरील ही हवाई संरक्षण प्रणाली कार्यरत राहणार आहे. या रॉकेट हल्ल्याबाबत बाकीचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही.
दरम्यान काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासातल व्यवहार बघणारे प्रभारी रॉस विल्सन यांनी काबूल विमानतळावरील माघारीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या नागरिकांनी काबूल विमानतळाकडे पाठ फिरवली आहे किंवा या नागरिकांना विमानतळावर अमेरिकेच्या दूतावासाच्या प्रतिनिधींकडून प्रवेश दिला गेलेला नाही, या वृत्ताचे त्यांनी खंडन केले.
हे एक प्रचंड धोकादायक ऑपरेशन आहे. अमेरिकेच्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हे काम सुरू आहे. त्यामुळे या नागरिकांना प्रवेश नाकारला गेल्याचे वृत्त खोटे आहे, असे त्यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये सांगितले.