राजुरी सोसायटीत “आपले सरकार’ सेवा केंद्राचा शुभारंभ
राजुरी – पुणे जिल्ह्यात 892 विविध कार्यकारी सोसायटी आहेत; पण जुन्नर तालुक्यात पहिलेच “आपले सरकार’ सेवा केंद्र राजुरी येथे सुरू झाले आहे. डिजिटल युग असल्यामुळे सर्व योजनांचा फायदा ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा होईल तर संस्थेलाही मोठा फायदा होईल त्यामुळे आपल्या संस्थेचे नाव होईल, असे प्रतिपादन सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी केले.
जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत “आपले सरकार सेवा केंद्रा’चा शुभारंभ सरसमकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, उपसरपंच माऊली शेळके, विघ्नहर कारखान्याचे संचालक पप्पू हाडवळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष कारभारी औटी, उपाध्यक्ष अविनाश औटी, वल्लभ शेळके, माजी सरपंच एकनाथ शिंदे, एम. डी. घंगाळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक लक्ष्मण घंगाळे,
चंद्रकांत जाधव, बाळासाहेब हाडवळे, लक्ष्मण फावडे, शाकीर चौगुले, बाळाजी औटी, रंगनाथ कणसे, सचिव संतोष वायकर आदी उपस्थित होते. सरसमकर म्हणाले, राजुरी ही एक आदर्श संस्था असून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे.
प्रत्येकच सोसायटी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत नाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून विविध उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे .शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. कर्ज वाटप करणे व वसूल करणे यापेक्षा अनेक प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे नमूद केले.